Events

24th National childrens Science Congress


12/28/16


बारामती, ता. 28- काहीतरी नवीन जाणून घेण्याच्या उत्सुकतेने आलेल्या विद्यार्थ्यांच्या तुडुंब गर्दीने आज विद्या प्रतिष्ठानचे मैदान फुलून गेले होते. नवीन काहीतरी जाणून घेण्याच्या उद्देशाने आलेले विद्यार्थी हरखून गेल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. येथे आयोजित 24 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये दुस-या दिवशी आज विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. फिल्म शो मध्ये निसर्ग व विज्ञानविषयक विविध माहितीपट दाखविले गेले. या छोट्या चित्रफिती पाहताना मुलांच्या चेह-यांवर अत्यंत उत्सुकता व आनंद दिसून आला. सर्पप्रदर्शनात संगमनेर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मधुकर दिवेकर, बाबासाहेब सरोदे, विवेक दातीर यांनी विविध सापांची मुलांना माहिती दिली. प्रत्यक्ष साप पाहून त्याची माहिती घेताना मुलांच्या चेह-यावर भीतीयुक्त उत्सुकता दिसून आली. सापांबाबत समाजात असलेले विविध गैरसमज दूर करुन साप हा माणसाचा कसा मित्र आहे याची माहिती या वेळी दिली गेली. अजगरापासून विविध प्रकारचे साप पाहून मुलांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. कोणता साप विषारी असतो व कोणता बिनविषारी याचीही माहिती दिली गेली. वैमानिक करिअरचेही मार्गदर्शन या प्रदर्शनादरम्यान प्रणव चिट्टे यांनी विमानांच्या साठहून अधिक प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. यात लढाऊ विमानांच्या प्रतिकृती अधिक संख्येने आहेत. या मध्ये जगातील पहिले विमान ज्या राईट बंधूंनी उडविले होते त्या विमानाचीही प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या शिवाय हेलिकॉप्टरच्या प्रतिकृती येथे आहेत. विमान व विमानतळ म्हणजे काय याचीही माहिती येथे दिली जात आहे. विद्यार्थी व पालकांसाठी दहावी बारावी नंतर वैमानिक म्हणून काय करिअरच्या संधी आहेत याचेही मार्गदर्शन येथे केले जात आहे. भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन या प्रदर्शनादरम्यान कतारच्या विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोग सादर करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली. या सांस्कृतिक उपक्रमात हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजराथ, दिल्ली व झारखंडच्या विद्यार्थ्यांनी आपली परंपरागत कला सादर करत भारतातील विविधतेचे दर्शन उपस्थितांना घडविले. नृत्य, लघुनाटिका, गीते, समूह गीत गायन, एकपात्री प्रयोगाद्वारे ही विविधता दिसून आली.