Events

Pratibimb


07/16/19


बेरोजगारी, आर्थिक विषमता व पर्यावरणाचा वेगाने होणारा –हास ही भारताच्या विकासनीतीपुढील महत्वाची आव्हाने आहेत, मात्र जो पर्यंत समाजाच्या तळागाळापर्यंत विकासप्रक्रीया पोहोचत नाही तो पर्यंत देशाचा विकास झाला असे म्हणता येणार नाही, असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित प्रतिबिंब व्याख्यानमालेत आज (ता. 16) ते बोलत होते. लेखिका दीपा देशमुख यांनी पर्यावरणीय –हास, विषमता, बेरोजगारी व अर्थकारण यातून घडणारा अनर्थ या विषयावर गोडबोले यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यात गोडबोले यांनी विचार मांडले. गोडबोले म्हणाले, शिक्षणावर एकूण अर्थसंकल्पाच्या सहा तर आरोग्यावर पाच टक्के पैसे खर्च होणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात ते एक टक्क्यांपर्यंतही होत नाहीत. जगात ज्या देशांनी प्रगती साध्य केली त्या देशांनी शिक्षण, आरोग्य व जमीन सुधारणा या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर दिला. देशातील लोकांच्या बुध्दीला व कल्पनाशक्तीला आज वावच मिळत नाही हे राष्ट्रीय नुकसान आहे. देशात आज संपूर्ण व अर्धबेकारांची संख्या प्रचंड आहे, जे काम करतात त्यांच्या एकूण कार्यक्षमतेपैकी फक्त 44 टक्के क्षमताच वापरली जाते, हेही देशाचे नुकसान आहे. काळा पैसा बाहेर काढणे, श्रीमंतावरील कर वाढविणे, संपत्ती कराची रचना करणे या सारख्या बाबी करुन अर्थव्यवस्था मजबूत करुन वित्तीय तूट भरुन काढण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ विकासदर वाढला म्हणजे प्रगती झाली असे म्हणणे साफ चुकीचे आहे, तळागाळातील व्यक्तीचे जीवनमान सुधारेल तेव्हाच विकास साध्य होईल. आर्थिक विषमता कमी होईल, शिक्षणासह आरोग्याच्या सुविधा प्रत्येकाला मिळतील, तेव्हाच विकासाची प्रक्रीया वेगाने सुरु होईल. प्राचार्य डॉ. भरत शिंदे, विद्या प्रतिष्ठानचे रजिस्ट्रार श्रीश कंभोज व योजना देवळे यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी परिचय करुन दिला.