Events

Success for Project Meghdoot,


05/29/20


प्रामाणिक प्रयत्नांना साथ मिळाली की स्वप्ने सत्यात उतरतात असे म्हणतात, याची प्रचिती बारामतीत आली आहे. सुनेत्रावहिनी पवार यांनी 10 वर्षांपूर्वी पर्यावरण व समाज संवर्धन व संरक्षणासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. जलसंधारणाच्या बारामतीतील कामांचा प्रारंभ सुनेत्रा पवार व फोरमच्या माध्यमातून प्रकल्प मेघदूतच्या माध्यमातून झाला. तलावातील गाळ काढण्यासोबतच ओढा खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण करुन टंचाईग्रस्त भागाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून झाला. गेल्या सात वर्षांपासून बारामतीत ही चळवळ अखंडपणे सुरु आहे. टंचाईवर मात करण्यासाठी बारामतीतील जलसंधारणाची चळवळ सुरू झाली. जी सलग 7 वर्षांपासून सुरू आहे. पाण्याअभावी निर्माण होणारा दुष्काळ, त्यातून होणारे स्थलांतर, खालावला जाणारा सामाजिक व आर्थिक स्तर अशा दुष्टचक्रामध्ये अडकलेल्या समाजबांधवांना, कष्टकऱ्यांना बाहेर काढणे हे आव्हान स्वीकारून आजपर्यंत 29 गावांमध्ये हा उपक्रम राबविला व त्या गावांना अनेक संकटातून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न फोरमच्या माध्यमातून करण्यात आला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 2 वर्षांपूर्वी बऱ्हाणपूर येथे जवळपास दीड किलोमीटर लांब व 80 फूट रुंद बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. ज्याची जवळपास 5 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता आहे. म्हणजेच 10 कोटी लिटर पाणी झिरपते तेंव्हा 5 कोटी लिटर पाणी साठते ज्याचा फायदा आज संपूर्ण गावाला होत आहे. याचाच अर्थ असा होतो की,समस्येचे उत्तर शोधले तर कठीण प्रश्नही सोडविता येतात हा विश्वास सुनेत्रावहिनी पवार यांनी निर्माण केला ज्याला बऱ्हाणपूरकरांनी देखील तितकीच तोलामोलाची साथ दिली. ज्याचा विधायक परिणाम आज संपूर्ण गाव अनुभवत आहे. पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आणि पिढ्यानपिढ्या पाहिलेली स्वप्ने आत्ता कुठे दृष्टीपथात आली.त्यामुळे ज्या ज्यावेळी बारामतीच्या सुजलाम सुफलामतेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी त्यात फोरमच्या कार्याचा खारीचा का होईना वाटा असेल एवढं मात्र नक्की.