विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देणे गरजेचे- प्रफुल्ल वानखेडे... बारामती, ता. 12- आपल्याकडे पाचवीपासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देणे गरजेचे आहे, मुलांनी वाचन करणे अत्यावश्यक असून सर्व प्रकारची पुस्तके मुलांनी वाचायला हवीत. इतर बाबींसोबत स्वताःची सर्वांगिण प्रगती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी केले. येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित प्रतिबिंब व्याख्यानमालेअंतर्गत सकाळ प्रकाशित गोष्ट पैशा पाण्याची पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांचे स्कील डेव्हलपमेंट आणि पैसापाणी काल, आज व उद्या या विषयावर व्य़ाख्यानाचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी वानखेडे यांनी हे प्रतिपादन केले. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, डॉ. आर.एम. शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, इंग्लंडमधील उद्योजक डॉ. सूरजकुमार पवार, बीना भोसले, डॉ. शिवाजी गावडे आदी या प्रसंगी उपस्थित होते. वानखेडे म्हणाले, पाच गोष्टींवर विद्यार्थ्यांसह सर्वांनीच भर द्यायला हवा. सेल्स व मार्केटींग प्रत्येकाला करता यायला हवे मराठी माणसाला याचा न्यूनगंड आहे तो दूर व्हायला हवा. तुम्हाला व्यक्त होण्यासाठी संभाषण कला अवगत करता यायला हवी, कोणतेही व्यवहार करताना तुम्हाला घासाघीस करता यायला हवी, कामे करताना वेळेचे व्यवस्थापन जमले पाहिजे आणि प्रत्येकाला आर्थिक साक्षरतेचे ज्ञान हवे. या पाच गोष्टी आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. पुस्तके वाचून आपण जगायला शिकतो, पैसे कमवायला लागल्यानंतर लोक वाचायच सोडूनच देतात, जे वाचन करतात त्यांना प्रगल्भता येते, त्यांचे जीवन अधिक संपन्न असते, त्या मुळे आपण व मुलांनीही सतत वाचन करायला हवे. आयुष्यात येणा-या अडचणींवर कशी मात करायची हेही आपण निश्चित करायला हवे. यश अपयश चालतच राहते, पण अपयश व यश आल्यानंतर काय करायला हवे हे शिकविणे गरजेचे आहे. टाईम ब्लॉकिंग, टाईम बॉक्सिंग, टाईम बॅचिंग हे नवीन प्रकार आता आले आहेत, ते शिकून घ्यायला हवेत. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले.