बारामती- ग्लोबल वार्मिंगचे संकट वेगाने आपल्यापर्यंत येत आहे. पर्यावरणाचा वेगाने होणारा –हास थांबविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असून पर्यांवरण संतुलन व संरक्षणासाठी स्वयंस्फूर्तीने काम व्हायला हवे, असे प्रतिपादन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आज फोरमच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले गेले. या रॅलीनंतर आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. या प्रसंगी नगराध्यक्ष योगेश जगताप, नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादी काँग्रसचे उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की बारामती परिसरातमध्ये बारामती सायकल क्लब व इतर सेवाभावी संस्थांच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी चांगले काम होते आहे. फोरमने ही चळवळ बारामतीत रुजविली व आज अनेक व्यक्ती व संस्था पर्यावरण चळवळ अधिक सशक्त करण्याचे काम प्रभावीपणे करीत आहे. बारामतीकरांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जागृती निर्माण करण्याचे हे सामूहिक काम महत्वाचे आहे. बारामती पंचक्रोशीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणावर झाडे लागली, त्या मुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते आहे, मात्र अजूनही झाडे लावून ती जगविणे गरजेचे आहे. वसुंधरा वाचविण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी उत्कृष्ट तहसिलदार म्हणून पारितोषिक मिळाल्याबद्दल बारामतीचे तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांचा सत्कार केला गेला. ओढा सरळीकरण व खोलीकरणाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाबद्दल सुनेत्रा पवार यांनी गौरवोदगार काढले. याच बरोबर आदरणीय वहिनी व मान्यवरांच्या शुभहस्ते वसुंधरा दिना निमित्त पुनावाला गार्डन येथे वृक्षारोपण करण्यात आले . या रॅलीस डॉ. के.डी. गुजर, डॉ. विभावरी सोळुंके, डॉ. सीमा गवसणे, डॉ. हाडके यांच्यासह बारामती सायकल क्लब,WTF सायकल ग्रुप व फोरम सदस्यांसह विद्यार्थी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.