बारामती, ता. 30- कर्करोगाबाबत अवास्तव भीती बाळगण्याची गरज नसली तरी महिलांनी काळजी घेण्याची मात्र गरज आहे. नियमित तपासण्या व स्वताःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे, असे प्रतिपादन कर्करोगतज्ज्ञ डॉ मनोज लोखंडे यांनी केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती परिसरातील महिलांसाठी कर्करोगाच्या जनजागृतीसाठी डॉ. लोखंडे यांनी आज महिलांना मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी ते बोलत होते. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, सिध्दीविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर, अँड. हरिष सणस, स्मिता बांद्रेकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बापू भोई, डॉ. प्राजक्ता पुरंदरे, ड़ॉ. सुहासिनी सोनवले यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. फोरमच्या वतीने कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत, ही दिलासादायक बाब असल्याचे लोखंडे म्हणाले. कर्करोगाबाबत विशेषतः महिलांमधील कर्करोगाबाबत अनेक समज गैरसमज आहेत, कर्करोगाबाबत अतिभीती बाळगण्याची जशी गरज नाही तशी अति बेफिकीरपणाही गरजेचा नाही, महिलांनी स्वताःच्या नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे. स्तनांचा व गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोगाबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. कर्करोगाबाबतचे गैरसमज काय आहेत व वस्तुस्थिती काय आहे या बाबतही लोखंडे यांनी सविस्तर विवेचन केले. आपल्याला ज्या क्षणी गाठ आहे अशी पुसटशी जरी शंका आली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिला संकोचामुळे व्याधी लपवितात, मात्र अनेकदा हा उशीरच त्यांच्या जीवावर बेततो अशी असंख्य उदाहरणे आहेत, त्या मुळे संकोच दूर सारुन कर्करोगाबाबत शंका असेल तर दवाखान्यात जा, असा सल्ला त्यांनी दिला. पंचेचाळीशीनंतर महिलांनी मॅमोग्राफी करुन घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात सुनेत्रा पवार यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये अजूनही कर्करोगाबाबत जनजागृती नाही ही बाब विचारात घेऊन फोरमच्या वतीने जनजागृती मोहिम हाती घेतल्याचे सांगितले. बारामती तालुक्यासह पंचक्रोशीमध्ये या पुढील काळातही महिलांमधील कर्करोगाचे वेळीच निदान होऊन औषधोपचा महिलांना मिळावा या साठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. वृक्षारोपण महिला ग्रामीण रुग्णालयात आज सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले.