बारामती, ता. 5- येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन या महाविद्यालयातील प्रा. डॉ. दीपाली राजेंद्र जाधव यांना इंडीयन जिनियस फाऊंडेनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. वैविध्यपूर्ण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी भारतातील पहिली महिला म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव या संस्थेने केला आहे. वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ इंडिया या संस्थेची मान्यता घेणे अनिवार्य आहे. या संस्थेच्या परिक्षण मंडळाने दीपाली जाधव यांच्या गेल्या तीस वर्षात संकलित केलेल्या महिलांच्या प्रगतीसंदर्भातील कात्रण संग्रहासह त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या लिखाणाचे सखोल परिक्षण केले. त्या मुळे अशा प्रकारे या क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करणा-या दीपाली जाधव भारतातील पहिल्या महिला ठरल्याची अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. दिनेश पैठणकर यांनी केलेल्या परिक्षणानंतर ही मान्यता दिली गेली. भारतात इतक्या प्रदीर्घ काळासाठी अशा प्रकारे संग्रह करणा-या दुस-या महिलेची नोंद नाही डॉ. जाधव यांच्या उपक्रमासाठी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रायोजकत्व देऊ केले होते. दीपाली जाधव यांच्यासह सुनेत्रा पवार यांचाही प्रायोजक म्हणून इंडियन जिनियस फाऊंडेशनच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. विविध क्षेत्रात कामगिरी या पूर्वी डॉ. दीपाली जाधव यांना या पूर्वी रिसर्च एक्सलेन्स हा इंडस फाऊंडेशनचा पुरस्कार त्यांना मिळाला असून, त्यांचे सोळा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदांमधून तर राष्ट्रीय पातळीवर सहा शोधनिबंध सादर झाले आहेत. करिअर प्लॅनिंग सिस्टीम ऑफ एम्प्लॉईज या विषयात त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.