बारामती : उन्हाच्या तीव्रतेसोबतच वन्यक्षेत्रातील पाण्याचे स्त्रोतही संपू लागले आहेत. वन्यजीवांना पाऊस सुरु होईपर्यंत पिण्याचे पाणी कमी पडू नये या साठी गेली तीन ते चार वर्षे पासुन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक जलदिन व जागतिक वनदिनाचे औचित्य साधून पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात येते, यंदा या उपक्रमाचे चौथे वर्षे असुन या मोहिमेचा आजपासून प्रारंभ झाला. फोरमच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उन्हाळा असेपर्यंत बारामती तालुक्यातील वन्यपरिक्षेत्रात वन्यजीवांसाठी टँकरमार्फत पाणी सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्या नुसार जलदिनाचे औचित्य साधून आज बारामती तालुक्यातील गोजूबावी येथे टँकरद्वारे पाणी सोडले गेले. बारामती वन्यपरिक्षेत्रात पारवडी, शिर्सुफळ, नारोळी, वढाणे, मोढवे, मुढाळे, साबळेवाडी या परिसरात काही ठिकाणी प्रत्येकी दोन तर काही ठिकाणी तीन असे एकूण 19 पाणवठे आहेत. येथे नैसर्गिक पाणी असते व प्राणी पाणी पिण्यासाठी तेथे नियमित येतात. यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने अनेक ठिकाणचे पाणी आटले आहे. या पाणवठ्यामध्ये वन्य विभागाच्या वतीने पाणी सोडले जाते मात्र सामाजिक बांधिलकीचा विचार करुन फोरमच्या वतीने प्राण्यांसाठी पाणी देण्यात येणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले . सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यातही फोरमच्या वतीने वन्यजीवांसाठी पाणी पुरविले जाणार आहे. बारामतीच्या वन्यपरिक्षेत्रात चिंकारा, लांडगे, कोल्हे, खोकड, तरस, मुंगुस, ससे, मोर या सारखे वन्यप्राणी आढळतात. यात चिंकारांची संख्या लक्षणीय आहे. उन्हाळ्यात पाणी नसल्याने अनेकदा हे प्राणी मानवी वस्ती जवळ येतात व अनेकदा अपघातात चिंकारांचा मृत्यू होतो. अशा घटना घडू नयेत या साठी पाणवठ्यातच पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे सौ. पवार म्हणाल्या.