बारामती- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा बारामतीकरांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे, बारामती नगरपालिकेचे अथक प्रयत्न प्रशंसनीय असून हा बारामती पँटर्न राज्यात सगळीकडे राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल बारामतीचे नगराध्यक्ष व सर्व कर्मचा-यांचा सत्कार तसेच कायदा व सुव्यवस्था उत्तम राखल्याबद्दल पोलिस अधिका-यांचा सत्कार सोमवारी फोरमच्या वतीने करण्यात आला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, उपनगराध्यक्षा रेश्मा शिंदे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील व चंद्रकांत कांबळे यांचा या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. डीजे व गुलालविरहीत मिरवणूक, जलकुंड व जलकुंभात विसर्जन, निर्माल्य पाण्यात न टाकणे यासह बारामतीकरांसाठी गणेशोत्सवाचे दहा दिवस सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी देणे या सारख्या उपक्रमांमुळे बारामतीच्या गणेशोत्सवाचा हा आदर्श राज्यातील इतर शहरांनीही घ्यावा असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. या शहरातील परिस्थिती इतकी चांगली होती की गणेशोत्सवात आम्हा अधिका-यांना प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटता आला. कार्यकर्त्यांनीच स्वयंसेवक बनून जी शिस्त दाखविली ती स्तुत्य असल्याचे तानाजी चिखले म्हणाले. गणेशोत्सवादरम्यान बारामतीकरांनी नगरपालिकेच्या आवाहनला प्रतिसाद देत यंदा दहा हजाराहून अधिक मूर्त्या नगरपालिकेकडे विश्वासाने सुपूर्द केल्याबद्दल सुभाष सोमाणी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सर्व सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी, विभागप्रमुख व सर्व कर्मचा-यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील वर्षी अधिक संख्येने जलकुंड व जलकुंभांची सोय नगरपालिका करेल असेही सोमाणी म्हणाले. या प्रसंगी बापू बांगर यांच्यासह आनंद लालबिगे, संदीप साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व नगरसेवक, विभागप्रमुख व कर्मचा-यांचा या प्रसंगी सत्कार केला गेला. नवीन विधायक पायंडा.... दर कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवरांचा अगोदर सत्कार अशीच प्रथा असते. यंदा मात्र सुनेत्रा पवार यांनी ही प्रथा बदलून प्रत्यक्ष जलकुंड व जलकुंभावर काम केलेल्या सर्व कर्मचा-यांचा सत्कार अगोदर करुन एक नवीन विधायक पायंडा पाडला. ज्यांचा या कामात सर्वाधिक मोलाचा वाटा आहे त्यांचा सत्कार अगोदर घेण्याच्या या प्रथेचे उपस्थितांनीही स्वागत केले.