एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडियातर्फे आज (शनिवार दि. 3 जून 2017) बारामतीमधील सोनाई ईस्टेट, कन्हेरी रोडवर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. पिंपळ, वड, कडूनिंब, आपटा अशी वेगवेगळ्या प्रकारची २८० झाडं यावेळी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा सौ.पुर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब भोसले तसंच रोटरी क्लब ऑफ बारामती, लायन्स क्लब ऑफ बारामती, बिल्डर्स एसोसिएशन ऑफ इंडिया, क्रेडाई आणि इतर सामाजिक आणि सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केलं. बारामती, काटेवाडी आणि कन्हेरीच्या ग्रामस्थांनी या कार्यक्रमात हिरीरीनं सहभाग घेतला. महत्त्वाचं म्हणजे सर्वांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे अवघ्या तीन तासांमध्ये २८० झाडं लावून झाली. लोकांनी यावेळी नुसती झाडंच नाही लावली तर त्यांना आळी सुद्धा केली आणि आजूबाजूचं प्लास्टिक सुद्धा साफ केलं. गेल्या शनिवारी या रस्त्यावरून जात असतांना मला या परिसरातील झाडांची कमतरता जाणवली. वाढत्या उन्हाच्या तिव्रतेमुळे तर ती अधिक प्राकर्षानं जाणवत होती. त्यामुळेच या भागात वृक्षारोपण करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कन्हेरीचं मारुती मंदिर पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. दर शनिवारी अनेक भविक या रस्त्यानं मंदिरात दर्शनासाठी जातात. या भाविकांनी सुद्धा या वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी व्हावं म्हणून आजचा शनिवारचा दिवस निवडण्यात आला आणि अपेक्षेप्रामाणे रस्त्यानं जाणाऱ्या मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला. त्याच मला खूप समाधान आहे. यंदाच्या पावसाळ्यात आपणही आपल्या परिसरात एक तरी झाड लावावं आणि त्याचं संगोपन करावं असं आवाहन मी आपल्याला या निमित्तानं करत आहे.