एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया आयोजित मातीतल्या खेळांच्या जत्रेला बारामतीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सुरूपट्ट्या, तळात मळ्यात, फुगडी, दोरीवरची उडी, लंगडी, टायर पळवीणे, गोट्या, भौरा, लगोर, विटी दांडु, खो-खो, पोत्यावरची उडी, मामाचं पत्र हारवलं अशा पारंपरीक पण लोप पावत चाललेल्या खेळांच आयोजन या जत्रेमध्ये करण्यात आलं होतं. शेकडो बालगोपाळांनी यावेळी या खेळांचा आनंद लुटला. तर अनेक प्रौढ त्यांच बालपण या निमित्तानं पुन्हा एकदा जगले. बारामती आणि आसपासच्या परिसरातील लहान मुलं सकाळी ६ वाजल्यापासूनच शहरातील शारदा प्रांगण मैदानात हजर होते. पारंपरीक खेळानं सुरूवात झालेल्या या कार्यक्रमाचा शेवट मात्र झुंबा डान्सनं करण्यात आला. यावेळी सर्वच जणांचे पाय झुंबा डान्सच्या म्युजिकवर थिरकले. अशा प्रकारचे खेळ याआधी कधी खेळायला मिळाले नसल्यानं खूप मज्जा आली असं सहभागी मुलांनी सांगितलं. हाच खरा त्या मागचा उद्देश होता. मोबाईल गेममध्ये अडकलेल्या आजच्या पिढीला पारंपरीक खेळांची माहिती करून देणं तसंच त्यांना खऱ्या खेळांची मज्जा काय असते याच महत्त्व पटवून देण्यासाठीच या जत्रेचं आयोजन केलं होत. महत्त्वाचं म्हणजे खेळालया आलेल्या मुलांच्या पालकांना त्यांचे खेळ घरी बसल्या लाईव्ह पाहता यावेत यासाठी फेसबुक आणि युट्युबवर हे खेळ लाईव्ह दाखवण्यात आले. बारामती मधला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. खालील लिंकवर तुम्ही खेळांचे व्हिडीओ पाहू शकता.