फोरमच्या वतीने आज बारामती शहरातील कलाशिक्षकांसाठी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षणाचे आयोजन आज विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर या शाळेत करण्यात आले होते. प्रसिध्द मूर्तीकार सुभाष देशमुख यांनी या प्रसंगी मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण कला शिक्षकांना दिले. त्या प्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, शाळेच्या प्राचार्या सी.एस. राय या प्रसंगी उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होण्यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरी आपल्या हाताने बनविलेल्या शाडूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांपासून होणारे प्रदूषण टाळता येणे सहज शक्य आहे, त्या मुळे हा प्रयत्न शाळांपासून व्हावा या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. ही चळवळ अधिक मोठी करण्यासाठी शिक्षकांनी यात प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी सुभाष देशमुख आणि बारामतीतील मुर्तीकार श्री.राजेंन्द्र गोलांडे यांनी शिक्षकांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. अत्यंत सुंदर व सुबक आकारात त्यांनी मूर्ती बनवून दाखविल्या. यंदा तीन हजार मूर्ती बनविण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.