बारामती, ता. 20- महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा अंधत्व निवारण सोसायटी व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीरात शुक्रवार व शनिवार मिळून दोन दिवसात 422 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया करण्यात आल्याची माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. या शिबीराचे यंदाचे पाचवे वर्ष होते. आजवर या शिबीरातून तीन हजारांवर रुग्णांच्या पूर्णपणे मोफत शस्त्रक्रीया करत त्यांना नवदृष्टी देण्याचे काम या माध्यमातून झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यंदाच्या शिबीरासाठी दीड हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी झाली होती व त्या पैकी 428 रुग्णांवर डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी शस्त्रक्रीया केल्या. आज दुस-या दिवशी शस्त्रक्रीया केलेल्या रुग्णांना घरी पाठवण्यात आले. या शिबीरामध्ये मोफत आणि तेही डॉ. लहाने सर व रागिणी पारेख यांच्या हातून शस्त्रक्रीया झाल्याचा आनंद रुग्णांनी व्यक्त केला. या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी डॉ. लहाने व पारेख यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शिबीर अशक्य असते, असे सांगत त्यांनी या पुढील काळातही अधिकाधिक रुग्णांना नवदृष्टी देण्यासाठी सातत्याने सहकार्य करावे व बारामतीत शिबीरासाठी यावे असे आवाहन केले. दरम्यान डॉ. लहाने यांनीही बारामतीत फोरमच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीरांचे आयोजन सातत्यपूर्ण रितीने सुरु असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. बारामतीत येऊन शस्त्रक्रीया करण्याचा आनंद काही औरच असल्याचे त्यांनी नमूद केले. आजवर तीन हजारांहून अधिक लोकांना सुनेत्रा पवार यांनी नवीन दृष्टी प्रदान केल्याचे सांगत त्यांनी हे काम मोठे असल्याचा उल्लेख केला. या प्रसंगी या शिबीरासाठी सहकार्य करणा-या सर्वांचाच सत्कार करण्यात आला. या शिबीराच्या माध्यमातून नवीन दृष्टी मिळवून दिल्याबद्दल या शिबीरात सहभागी रुग्णांनी सुनेत्रा पवार, डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांचे आभार व्यक्त केले. प्रत्यक्ष भेटून लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.