गणपती बाप्पा मोरया....पुढच्या वर्षी लवकर या....आज या जयघोषात लाडक्या बाप्पाला आपण निरोप दिला. आजचा दिवस एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या इतिहासात संस्मरणीय ठरावा असाच आहे. गेल्या सात वर्षांपासून बारामती मध्ये पर्यावरणाची चळवळ रुजविण्याचा जो प्रयत्न आदरणीय सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली फोरमच्या टीमने केला त्याला फळे येताना आज दिसून आली. सर्वप्रथम गणेशमूर्तींचे विसर्जन नीरा डावा कालव्यात न करता ते कुंडात कराव अशी संकल्पना फोरमच्या वतीने मांडली गेली, ती प्रत्यक्षात आणली गेली, त्या वेळेस अनेकांनी धार्मिक भावनांच्या नावाखाली त्याला कमालीचा विरोध केला. अगदी पोलिस ठाण्यापर्यंत काहींनी धाव घेत याला विरोध केला, मात्र आज चित्र नेमके उलटे दिसले. आज असंख्य बारामतीकरांनी आपणहून पर्यावरणपूरक विसर्जन सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत फोरमच्या या कामाची प्रशंसा केली, विशेषतः बाळ गोपाळांनी आपल्या आई वडीलांना कालव्यात बाप्पाचे विसर्जन करु नका अशी जेव्हा विनंती केली, तेव्हा फोरमच्या चळवळीने मूर्त स्वरुप धारण केल्याचे समाधान सर्वांनाच मिळाले. बारामती नगरपालिकेने पुढाकार घेत बारामती शहरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची प्रथा सुरु केली. आठ ठिकाणी प्लॅस्टिक टँकमध्ये तर चार ठिकाणी कृत्रीम तलाव उभारुन तेथे नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास प्रारंभ केला. दरवर्षी लोकांचा याला मिळणारा पाठिंबा वाढतो आहे, नीरा डावा कालव्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात रोखण्यासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांनी ज्या उद्देशाने लोकांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले, त्याला यश देताना दिसत आहे. यंदा विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी गणेशमूर्ती साकारायची, तीही शाडूची आणि तिचीच प्राणप्रतिष्ठा करायची असा प्रयत्न फोरमने केला आणि तब्बल दोन हजारांवर शाडूच्या गणेशमूर्ती यंदा तयार झाल्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या भक्तीभावाने त्याची घऱाघरात प्राणप्रतिष्ठा केली आणि तिचे विसर्जन केले. एकीकडे दोन हजार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी झाल्या आणि दुसरीकडे नीरा डावा कालव्यात विसर्जन न करता कृत्रीम तलावात विसर्जन झाल्यामुळे पर्यावरणाचा दुहेरी समतोल राखण्यात फोरमला यश मिळाले. आज पर्यावरण संतुलनाच्या चळवळीतील फोरमच्या दृष्टीने महत्वाचा दिवस म्हणावा लागेल. ज्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली तो उद्देश हळुहळू मूर्त स्वरुपात दिसू लागला आहे, लोकांची मानसिकता बदलू लागली आहे. अनेकदा .....करुन दाखविले....असा शब्दप्रयोग वापरला जातो, आज आम्हा सर्व फोरम सदस्यांना होय...आम्ही करुन दाखविले..... हा शब्दप्रयोग वापरताना अभिमान वाटत आहे, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत आम्ही सातत्यपूर्ण काम करुन खारीचा वाटा उचलत काही प्रमाणात का होईना पण काहीतरी करुन दाखवू शकलो...फोरमच्या प्रत्येक उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद देणा-या सर्व बारामतीकरांचे मनापासून आभार......