बारामती, ता. 23- येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने 78 रुग्णांवर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात आल्या. बारामती पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना मोफत बसने मुंबई येथे नेऊन 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी या शस्त्रक्रीया केल्या. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ज्या रुग्णांच्या शस्त्रक्रीया ऑगस्ट महिन्यात झालेल्या शिबीरात होऊ शकल्या नव्हत्या, त्यांना मुंबईला नेऊन टप्याटप्याने शस्त्रक्रीया केल्या जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात 96 रुग्णांना मुंबई येथे नेण्यात आले. त्या पैकी 78 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आल्या. बारामती ते बारामती या रुग्णांचा प्रवास, जेवण, नाश्ता हा सर्व खर्च फोरमने केला व रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रीया करण्यात आल्या. या पैकी अनेक रुग्णांची तातडीने मोतीबिंदू शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते, सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारामुळेच या शस्त्रक्रीया वेळेत होऊ शकल्याने या रुग्णांना नवदृष्टी प्राप्त झाल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट महिन्यात झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीरात 428 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रीया झाल्या. दरम्यान फोरमच्या वतीने आजवर झालेले शिबीर व मुंबई मधील मिळून 3300 पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रीया झाल्या व या सर्व शस्त्रक्रीया संपूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्यात ज्या रुग्णांवर शस्त्रक्रीया झालेल्या नाहीत अशा रुग्णांशी फोरम संपर्क साधून पुढील टप्प्यात मुंबईला त्यांना नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रीया करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. अधिकाधिक रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रीया करण्याचा फोरमचा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या. डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी जे.जे. रुग्णालयाच्या माध्यमातून विनामूल्य शस्त्रक्रीया करुन देण्यासाठी जे सहकार्य केले त्या बद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.