*निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात खेळाचा समावेश असणे गरजेचे आहे.* खेळ खेळल्याने मानसिक व शारिरीक आरोग्य तंदुरस्त तर राहतेच मात्र अनेक व्याधींपासूनही मुक्तता होते असे प्रतिपादन *प्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत मगर यांनी केले*. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित *"प्रतिबिंब"* अंतर्गत खेळातील दुखापतींची काळजी व व्यवस्थापन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, व्हीआयआयटीचे संचालक डॉ. अमोल गोजे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. खेळ खेळताना दुखापत होऊ नये या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, स्नायू किंवा सांधा दुखावला गेल्यावर त्याची नेमकी काळजी कशी घ्यायची व काय उपाययोजना करायची याचे सुंदर मार्गदर्शन या व्याख्यानामध्ये डॉ. मगर यांनी खेळाडूंसह विद्यार्थ्यांना केले. खेळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असणे गरजेचे आहे, मात्र खेळताना दुखापत होऊ नये याची काळजी घ्यावी व दुखापत झालीच तर त्यातून लवकर बाहेर पडून दैनंदिन जीवन कसे व्यतित केले पाहिजे याची माहिती डॉ. मगर यांनी या वेळी दिली. विद्यार्थ्यांनी व्याख्यानानंतर प्रश्न विचारुन शंकांचे निरसन केले.