– टंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील नागरिकांकडून पाण्याचा होणारा अतिवापर टाळण्यासाठी येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पथनाट्याचे आयोजन केले जाते आहे. एकीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना दुसरीकडे शहरी भागात मात्र पाण्याचा बेसुमार वापर लोक करतात. हा वापर कमी केला तर आपोआपच पाणी कमी लागणार आहे, ही जाणीव नागरिकांत व्हावी या साठी फोरमने गणेशोत्सवाचे औचित्य साधत म.ए.सो.चे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या मुलींचे पथनाट्य जागोजागी सादर केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या पथनाट्याचा पहिला प्रयोग सादर केला गेला. या पथनाट्याच्या माध्यमातून गाडी धुण्यासाठी किती पाणी वाया जाते, शौचालयात फ्लश केले तर किती पाणी जाते, वाया जाणारे पाणी झाडांसाठी वापरले पाहिजे, पावसाचे छतावर पडणारे पाणी वाय जाऊ देण्याएवजी ते कसे जिरवावे या बाबतची मनोरंजनातून माहिती या पथनाट्यातील मुली सादर करतात. फोरमच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून हे पथनाट्य सादर केले गेले. अत्यंत सहज साध्या भाषेत या पथनाट्यातील आशय लोकांना सांगितला जातो. गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत आबा गणेश महोत्सव, कसबा गणेश महोत्सव, गोकुळवाडी गणेशोत्सव मंडळ व इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळासह बारामती गणेश फेस्टीव्हलमध्ये प्रयोग सादर होणारा आहे . सर्वच ठिकाणी या पथनाट्याला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रवींद्र गडकर यांनी या पथनाट्याचे लिखाण केले असून यात साक्षी आंबेकर, प्राजक्ता गावडे, प्रतिक्षा साबळे, हर्षाली कारंडे, साक्षी पानसरे, सुंदर सुतार, तनिष्का गुंदेचा मुथा, अपूर्वा गायकवाड, वैष्णवी भोसले, भूमी शहा यांनी हे पथनाट्य सादर केले.