एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित " प्रतिबिंब " अंतर्गत "युवा पिढीचे तारुण्यातील प्रश्न " या विषयावर रोशनी फाऊंडेशनचे संस्थापक श्री.प्रविण निकम यांचे व्याख्यान ग. दि. मा. सभागृह विद्या नगरी येथे संपन्न झाले. श्री. प्रविण निकम यांनी 2011 साली रोशनी फाऊंडेशनची स्थापना केली. मुलींच्या किशोरावस्थेतील समस्यांवर अगदी जाणीवपुर्वक अभ्यास करुन त्यावर मात करण्याचे मार्ग सुचविण्याबरोबरच या वयातील मुला मुलींना प्रेरित करण्याचे महतकार्य त्यांनी सुरु केले असून उद्याचा सक्षम,सुदृढ आणि प्रगल्भ भारत घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगण्याचे आवाहन युवा-युवतींना केले. प्रविण निकम यांच्या कार्याची दखल संपूर्ण देशात घेतली जात आहेच इतकेच नाही तर खुद्द इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी इंग्लडला बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला केले आहे. कॉमनवेल्थ युथ कौन्सिलचे ते एशिया रिजनल प्रतिनिधी म्हणुन कार्यरत असणारे पहिले भारतीय आहेत. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ जांबिया येथे निवडणुक निरिक्षक म्हणुनही त्यांनी चमकदार कामगिरी पार पाडली आहे. त्यांच्या या अनोख्या व आवश्यक कार्यामुळे आजवर प्रविण निकम यांना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. लंडनमध्ये " चॅम्पियन ऑफ युथ " पुरस्कार एशियन रिजनसाठी "काॅमनवेल्थ युथ ॲवाॅर्ड" अमेरिकेच्या वतीने "सेफर रोड सेफर इंडिया" या फेलोशिपचे मानकरी. भारत सरकारच्या वतीने " नॅशनल युथ ॲवाॅर्ड " महाराष्ट्र शासनाच्या वतीने " युथ ॲवाॅर्ड " पुणे मिररच्या वतीने " हिरो ॲवाॅर्ड " अशा विविध पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. समाज ज्या विषयावर व्यक्त होण्यास संकोच करतो आणि अनेक समस्यांना ओढावून घेतो त्याच विषयावर अत्यंत प्रभावीपणे सर्व समस्यांना हात घालत किशोर अवस्थेतील युवा युवतींना व्यक्त होण्याचे आणि आपल्या समस्यांची सोडवणूक आपण स्वतःच कशी करू शकतो याचे अतिशय रंजक मार्गदर्शन श्री प्रविण निकम यांनी या वेळी केले. सोबतच मुलांच्या सर्वच शंकांचे निरसन केले. या विषयावर जास्तीत जास्त व्यक्त होऊन एक सुदृढ समाजाची निर्मिती आपण करू शकतो हा विश्वास या प्रतिबिंब मधून मिळाल्याची भावना सहभागी विद्यार्थी विद्यार्थीनींनी व्यक्त केली. या प्रसंगी अनेक आजी माजी पदाधिकारी, प्राध्यापक, प्राध्यापिका,पालक, विद्यार्थी,शिक्षक आणि फोरम सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.