बारामती शहर, ता. 15- मासिक पाळी या विषयाबाबत महिलांसोबतच पुरुषांमध्येही जागृती होण्याची नितांत गरज आहे, महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षा रोशनी या सेवाभावी संस्थेचे प्रमुख प्रवीण निकम यांनी व्यक्त केली. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत फोरमच्या वतीने 2018 या वर्षीचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा वसुंधरा पुरस्कार बुधवारी (ता. 14) फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रवीण निकम यांना प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. स्मृतीचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अभिनेते अशोक समर्थ, प्लॅस्टिकमुक्तीचे काम करणा-या डॉ. वर्षा सिधये, महिला ग्रामीण रुग्णालयाचा नावलौकीक वाढविणारे डॉ. बापू भोई, वृक्षसंगोपनाचा वसा घेतलेले कृष्णराव कदम, झुंबा नृत्य प्रकारात लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त करणारा अमर निकम तसेच कुस्तीमध्ये बारामतीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवणारा उत्कर्ष काळे या सहा जणांना बारामती आयकॉन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष कामगिरी तसेच विविध नव्याने निवडीबद्दल बिरजू मांढरे, विद्याधर काटे, प्रेरणा गुप्ता, सतीश ननवरे, इरफान इनामदार, चिराग शहा (मुंबईकर), अजय फराटे, तुषार लोखंडे, फखरुद्दीन भोरी यांचा सत्कार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रवीण निकम म्हणाले, आजही समाजात अनेक सुशिक्षीत कुटुंबातही अनिष्ट प्रथा सुरुच आहेत, मासिक पाळी व लैंगिक शिक्षण या विषयात मुलांशी पालक मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यातून गैरसमज वाढतात मुले नको त्या दिशेला जाण्याची भीती वाढते, त्या मुळे पालक व समाजानेही या विषयात मोकळेपणाने शास्त्रशुध्द गोष्टींची माहिती देण्याची गरज आहे. यातून अनेक गैरसमज टाळता येतील आणि भविष्यातील अडचणींवर मात करणे शक्य होईल. या प्रसंगी अशोक समर्थ, वर्षा सिधये, अमर निकम यांनीही आपल्या मनोगतात आपल्या जीवनकार्याविषयी माहिती देताना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या कामाची प्रशंसा केली. प्रास्ताविकात सुनेत्रा पवार यांनी फोरमच्या गेल्या अकरा वर्षांच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. भविष्यात प्लॅस्टिकमुक्तीसाठी फोरमच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वरनाद संगीत विद्यालयाच्या वतीने विशाखा मयेकर व सहका-यांनी गणेश वंदना सादर केली. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, तहसिलदार हनुमंत पाटील, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. ज्ञानेश्वर जगताप व संगीता काकडे यांनी सूत्रसंचालन केले. फोरमच्या कामाविषयी कमालीची आस्था फोरमच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभास आज समाजाच्या सर्वच स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षभर एन्व्हॉर्यमेंटल फोरम ज्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेने कार्यरत असते, अशा फोरमला सदिच्छा देण्यासोबतच त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आज आम्ही आवर्जून हजेरी लावल्याचे अनेक बारामतीकरांनी या प्रसंगी आवर्जून नमूद केले. वहिनींना शुभेच्छा देण्यासाठी उदंड गर्दी सुनेत्रा पवार व एन्व्हॉर्यमेंटल फोरम हे बारामतीत अतूट नाते. फोरमच्या विविध कामानिमित्त समाजातील प्रत्येक घटकाचा संबंध आलेला असल्याने सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आज बारामतीकरांनी मोठी गर्दी केली होती, तुमच्या फोरममध्ये आम्हालाही काम करण्याची इच्छा आहे, आम्हालाही संधी द्या अशी विनंती अनेकांनी या वेळी त्यांना केली.