बारामती- वसुंधरा दिना निमित्त प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांची सवय लागावी या साठी जनजागृती करत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आज एक हजाराहून अधिक कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले गेले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव यांच्यासह नगरसेवक अमर धुमाळ, सत्यव्रत काळे, मयूर लालबिगे, संतोष जगताप, नवनाथ बल्लाळ, सुहासिनी सातव, नीता चव्हाण, नीलीमा मलगुंडे, रुपाली गायकवाड, मयुरी शिंदे, सविता जाधव, शारदा मोकाशी, अनिता जगताप, कमल कोकरे, वीणा बागल, बेबी मरिअम बागवान, अश्विनी गालिंदे यांच्यासह नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. प्लॅस्टिक कॅरिबॅगसह सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर टाळून आता कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर सर्वांनी करावा या साठी प्रबोधन करण्याच्या उद्देशाने फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला. राज्यात सगळीकडेच प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत. बारामतीतही फोरमच्या वतीने जनजागृती व प्रबोधनासह नागरिकांना कापडी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. गुरुवारी बारामतीचा बाजार असतो. आज गणेश मार्केट मध्ये फोरमच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना या पिशव्यांचे वाटप केले व पुढील काळात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत आवाहन केले.