बारामती -...जीवनात एखाद्या ध्येयाने झपाटलो गेलो तर काहीही अशक्य नसते, मेहनतीची तयारी असेल तर ग्रामीण भागातील युवकही यशाची शिखरे सहजतेने गाठू शकतात, आपल्या गुणवत्तेला सिध्द करण्यासाठी युवकांनी सातत्याने खडतर परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे..... बारामतीचे पहिले आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी आज आपला जीवनपट उलगडून दाखविताना विद्यार्थ्यांना हा संदेश दिला. ऑस्ट्रिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेचे अंतर पूर्ण करुन ग्रामीण भागात हा किताब पटकाविणा-या सतीश ननवरे याचा विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने शनिवारी गदिमा सभागृहात सत्कार केला गेला. या प्रसंगी त्यांच्या पत्नी सपना ननवरे, आई लक्ष्मीबाई ननवरे याही उपस्थित होत्या. प्रसिध्द निवेदक ज्ञानेश्वर जगताप यांनी प्रकट मुलाखतीद्वारे सतीश ननवरे यांना बोलते केले आणि त्यांनी बालपणापासून ते या स्पर्धेच्या यशापर्यंतचा प्रवास उलगडला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते सतीश ननवरे तसेच काटेवाडी येथील इंटेलिजन्स ब्युरो येथे पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झालेले आलताफ शेख यांचा सत्कार करण्यात आला. आलताफ शेख यांनी बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर अँकेडमी येथे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करुन हे यश प्राप्त केले आहे. जलतरण, धावणे व सायकलींग अशा तीन प्रकारात ही स्पर्धा असते व जगभरातून व्यावसायिक स्पर्धक स्पर्धेसाठी येतात, अशा वेळेस ग्रामीण भागातून अनुभव नसतानाही हे आव्हान पेलण्याच्या जिद्दीने वर्षभर तयारी करुन विक्रमी वेळेत अंतर पूर्ण करुन दाखविण्याची किमया कशी साध्य केली याचे विवेचन ननवरे यांनी मुलाखतीतून केले. परदेशी हवामान, व्यावसायिक स्पर्धक, नवीन मार्ग या सर्वांना जुळवून घ्यायला काही काळ लागला खरा पण स्पर्धा निश्चित केलेल्या वेळेतच पूर्ण करायची ही जिद्द बाळगूनच स्पर्धेला उतरल्याने फारसे दडपण नव्हते. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर भारतीय तिरंगा हवेत उंचावताना जो अभिमान वाटला तो शब्दात व्यक्त करण्याजोगा नव्हता. या पुढील काळात ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांना मोफत सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्याची माझी तयारी आहे. आता अल्ट्रा मॅन स्पर्धेत उतरण्यासाठी माझी तयारी सुरु होईल, असेही ननवरे यांनी या वेळी सांगितले. या वेळी सन्मानपत्राचे वाचन अॅड.अमर महाडिक यांनी केले.