बारामती, ता. 1- ग्रामीण भागात मोतीबिंदूचे प्रमाण वेगाने वाढत आहे,त्यामुळे आगामी काळात शिबीरांचा कालावधी वाढवून अधिकाधिक संख्येने ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, राज्य शासनाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व पुणे जिल्हा अंधत्व निवारण सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आज बारामतीत उदघाटन झाले. त्या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपसभापती शारदा खराडे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राहुल शेवाळे, तहसिलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप, डॉ. मीरा चिंचोलीकर, डॉ. बापू भोई, डॉ. सचिन कोकणे, दिगंबर जैन देवस्थानचे अध्यक्ष किशोर सराफ यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मोतीबिंदू निवारणासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जातात, बारामतीत मोतीबिंदू शिबीर करण्याचा वेगळाच आनंद असतो, येथील ज्येष्ठ नागरिकांना दृष्टीदानासाठी सुनेत्रा पवार व त्यांची टीम सातत्याने प्रयत्न करते याची प्रशंसा तात्याराव लहाने यांनी केली. या प्रसंगी डॉ. रागिणी पारेख, संदीप पखाले, किरण गुजर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात संस्थेच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी फोरमच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. गेल्या काही वर्षात फोरमने केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. अधिकाधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया व्हाव्यात असा प्रयत्न असतो, त्या मुळे या शिबीरात ज्यांच्या शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत, त्यांना मुंबईला नेऊन शस्त्रक्रीया करुन दिल्या जातात. या शिबीरातील रुग्णांना एक रुपयाही खर्च करावा लागत नाही हे शिबीराचे वैशिष्टय असल्याचे त्यांनी सांगितले. फोरमच्या वतीने कर्करोग, मासिका जागर अभियान, मधुमेह या तीन विषयांवरही आगामी काळात काम करणार असल्याचेही पवार म्हणाल्या.