बारामती शहर, ता. 11- ..पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आज शहरातील अनेक शाळातील विद्यार्थ्यांच्या हातांनी शाडूच्या मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारल्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून होणारे प्रदूषण पूर्णपणे रोखण्याचा संकल्प केला. येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्याची महाकार्यशाळा आज महाराष्ट्रा एज्युकेशन सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या मैदानावर झाली. शहरातील पंधरा शाळातील विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारल्या तर काहींनी मूर्तीला रंगरंगोटी करुन सुंदर मूर्ती घडविली. नवनिर्मितीचा आनंद आणि सृजनशीलतेचा अनोखा मिलाफ या कार्यशाळेच्या निमित्ताने आज दिसला. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना पर्याय म्हणून शाळातून विद्यार्थ्यांच्या हातून गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी चार वर्षांपूर्वी मांडली व तिला मूर्त स्वरुप दिले. दरवर्षी किमान दोन हजारांवर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या कमी झाल्या असून प्रदूषण कमी करण्यात फोरमला यश मिळाले आहे. प्रत्येक शाळातून विद्यार्थ्यांनी कलाशिक्षकांच्या सहाय्याने या मूर्ती साकारल्या, यात नवनिर्मितीचा आनंद तर होताच पण स्वताः मूर्ती घडविल्याने त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संबंधित विद्यार्थ्यांच्या घरात होत असल्याने पर्यावरणाचा संदेश हजारो कुटुंबात या निमित्ताने पोहोचल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. आज सकाळपासूनच अनेक विद्यार्थ्यांच्या हातातून साकारलेल्या सुंदर मूर्त्या पाहून इतरही विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती साकारण्याची प्रेरणा मिळत होती. दरवर्षी शाडूच्या मातीच्या मूर्त्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न फोरमच्या माध्यमातून केला जात असून त्याला सर्वच शाळांचा सक्रीय पाठिंबा प्राप्त होतो आहे. बारामतीत गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या या चळवळीचे स्वरुप व्यापक होत असून मुले उत्स्फूर्तपणे आता मूर्ती बनवित असल्याचेही आज दिसून आले. गणेशमूर्तीं साच्याविनाही काही विद्यार्थ्यांनी साकारण्याचा सुंदर प्रयत्न दिसला. या कार्यशाळेमध्ये म.ए.सो.चे.कै.गजानराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर, अनेकांन्त इंग्लिश मिडीयम स्कूल, आर.एन.अग्रवाल टेक्निकल हायस्कूल, जनहित प्रतिष्ठानचे विद्यालय, श्री छत्रपती शाहू हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल,विद्यानगरी, धो.आ.सातव (कारभारी) हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर ,पिंपळी, श्रीमती गंगूबाई कृष्णाजी काटे देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काटेवाडी, झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कूल, कटफळ, विद्या प्रतिष्ठान डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल, काटेवाडी हायस्कूल, काटेवाडी या शाळा सहभागी झाल्या होत्या.