वन्यजीवांनाही भावना असतात आणि तेही जिवाला जीव देतात, त्यांची भाषा समजून घेऊन त्यांच्याशी मैत्री केली तर त्यांच्याइतके प्रामाणिक मित्र दुसरे कोणीही नसतात....बीड जिल्ह्यातील तागडगाव येथे वन्यजीवांसाठी प्रकल्प चालविणारे सिध्दार्थ सोनवणे आपला अनुभव कथन केले.... एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित वसुंधरा पुरस्कार प्रदान समारंभात सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. फोरमच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळावा व पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा.उंडे, संस्थेच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. तागडगाव येथील वन्यजीवांसाठी सातत्याने गेली अनेक वर्षे काम करणारे सिध्दार्थ व सृष्टी सोनवणे या दांपत्याला यंदाचा वसुंधरा पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. या प्रसंगी बारामतीच्या नावलौकीकात भर घालणा-या अँड. संजय प्रल्हाद मोरे, डॉ. सुजित अडसूळ, विक्रम खलाटे, डॉ. सौरभ मुथा, संदीप मेनसे, इन्सिया नासिकवाला, दीप्ती भोसले कुलकर्णी, डॉ. नीलेश महाजन, डॉ. सुहास दराडे व अभिषेक ढवाण या दहा मान्यवरांना या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती आयकॉन या पुरस्काराने सन्मानित केले गेले. सिध्दार्थ सोनवणे यांनी मनोगतात आपला जीवनप्रवास कथन केला. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून जखमी किंवा वयोवृध्द प्राण्यांचा सांभाळ करुन त्यांच्यावर स्वखर्चाने उपचार करुन बरे झाल्यावर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्याचे काम करताना वेगला आनंद मिळाला. चाकोरीबाहेरील जीवन जगण्याचा प्रयत्न करताना पत्नीने मनापासून साथ दिली व त्या मुळे हे काम करु शकलो. प्रास्ताविकात सुनेत्रा पवार यांनी फोरमच्या वाटचालीचा आढावा घेतला. फोरमच्या जलसंधारण चळवळीमुळे बारामती व दौंड तालुक्यात सत्तर कोटी लिटर अतिरिक्त पाणी साठणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीकरांनी या पुढील काळातही साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शशांक पवार, सुरेंद्र भोईटे, अमोल कावळे, दत्ता बोराडे, प्रवीण जगताप या फोरम सदस्यांचाही या प्रसंगी सत्कार केला गेला. या प्रसंगी संदीप मेनसे, इन्सिया नासिकवाला, डॉ. सुजित अडसूळ, डॉ. सौरभ मुथा यांनी मनोगत व्यक्त केले.